पुरंदर रिपोर्टर Live
यवतमाळः प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पती आणि मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर आधीच दुःखद अवस्थेत असलेल्या एका 42 वर्षीय विधवा महिलेसोबत तिच्या सासरच्या लोकांनी जे कृत्य केलं, ते माणुसकीला काळिमा फासणारं आहे.
महिलेचा नवरा आणि लहान मुलगा यांचा काही काळापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या वेळी तिच्या सासरच्यांनी तिला आधार देण्याऐवजी तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. रोजगार देतो, नवा संसार उभारतो, अशा आश्वासनाच्या बहाण्याने तिला मध्य प्रदेशात नेण्यात आलं. पण खरी योजना वेगळीच होती.
महिलेच्या नणंद आणि नणंदेच्या नवऱ्याने मिळून तिला गुजरातमधील मोरंबी जिल्ह्यातील हिरापूर येथील सुरेश पोपटभाई चौसानी (वय४८ ) नावाच्या व्यक्तीकडे तब्बल १ लाख २० हजार रुपयांना विकलं. सुरेशने या महिलेशी लग्न केल्याच्या बहाण्याने तब्बल दोन वर्षे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या अत्याचारातून तिला मूल देखील झालं. त्यानंतर सुरेशने तिला तिच्या गावी आणून सोडलं आणि स्वतः फरार झाला.
दरम्यान या प्रकरणात आरोपींमध्ये सासू दर्शना (60), तिचा दुसरा पती गणेश नामदेव भेले (65), दीर संदीप सुभाष सुरजोशे (40), नणंद पूजा पाटीदार (38) व तिचा नवरा जितेंद्र पाटीदार (45) यांचा समावेश आहे. तसेच गुजराती व्यक्ती सुरेश पोपटभाई चौसानीलाही आरोपी करण्यात आलं आहे. सर्वांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या महिले बाबत 2023 साली बेपत्ता झाल्याची तक्रार आर्णी पोलिसात दाखल करण्यात आली होती. पोलीस तपास सुरु असतानाच महिलेला परत आणण्यात आलं. त्यानंतर तिच्या जबाबातून सर्व प्रकार उघड झाला आणि पोलिसांसमोर थरकाप उडवणारी माहिती आली.
या प्रकारानंतर यवतमाळ पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संबंधित आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारी कृत्य, फसवणूक, महिलेशी फसवून विवाह, शारीरिक आणि मानसिक छळ, आणि मानव विक्री यासारख्या गंभीर कलमांतर्गत कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास अधिक खोलात जाऊन केला जात असून, आणखी काही धक्कादायक तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.
0 Comments